- डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, महाड.
. ९०४९३२४३२१ - बदलापूरच्या घटनेनंतर सगळ्याच क्षेत्रात विशेषत: सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात एक प्रचंड काळजीचे वातावरण तयार झालं आहे. आपला पाल्य (मुलगा किंवा मुलगी) शाळेत जाताना, बाहेर कुठे जाताना येताना सुरक्षित राहील का? त्याला कोणी इजा तर करणार नाही ना? या काळजीमुळे पालक प्रचंड तणावाखाली आहेत. मध्यंतरी शुभ्रा नावाच्या एका आठवी नववीतल्या मुलीला तिचे पालक घेऊन आले. शुभ्रा अगदी जन्मल्यापासून माझी पेशंट. नेहमीच अगदी आनंदी आणि उत्साही. ‘मलाही डॉक्टर व्हायचे आहे ‘ हे तिचं स्वप्न. सतत काहीतरी विचारणार. अत्यंत चौकस. पण यावेळेस ती खूपच नर्व्हस दिसत होती. एका खुर्चीत अस्वस्थ पण अत्यंत शांतपणे बसली होती आणि तिच्या आई-वडिलांनी बोलायला सुरुवात केली. ‘डॉक्टर, बघा जरा हीच्याकडे. घरी पण अशीच शांत बसून असते. कुठे जात नाही, येत नाही, खूप चिडचिड करते. अभ्यास तर बंदच आहे. आणि आता तर वेगळेच चालले आहे. मला शाळेत जायचं नाही म्हणून हट्टीपणा करते. तुम्हीच बोला तिच्याशी. आम्ही तिला विचारलं तर ती काही सांगत नाही’. तिघे अत्यंत गंभीर होऊन समोर बसले होते.
- मी तिघांना एकदा पाहिले आणि त्या मुलीकडे पाहून हसत म्हणालो ‘खूप छान! तु बिलकुल शाळेत नको जाऊस. शाळेत जाऊन खूप अभ्यास करा. मग कॉलेजला जा. तिथे परत मान मोडेपर्यंत अभ्यास करून मेडिकलला जा. मेडिकलला गेल्यानंतर तर सात आठ वर्ष पहायला नको. परत ती सगळी तपश्चर्या ! त्यापेक्षा आता शाळा सोडली तर तुला कुणीही नोकरी देईल. कुठेतरी धुणंभांडे कर, कुठेतरी स्वयंपाक कर, कुठेतरी झाडलोट कर. मग आपण नवराही तसाच काम करणारा बघू. आणि तुझी कमाई पण लगेच सुरु होईल. छान ना?’ सगळेच हसले आणि वातावरण थोडसं हलकं झालं. आणि मी फक्त तिच्याशी बराच वेळ बोलत बसलो. तिला थोडेसे रिलॅक्स केलं आणि तिच्या बोलण्यातून एक विदारक सत्य बाहेर आलं. ‘कुणाला सांगू नका काका, प्लीज’ असं म्हणू तिने मला जे सांगितले त्याने मी चक्रावलो. वर्गातल्या मुलाने तिच्याशी गैरवर्तन केलं होतं, नको तिथे नको तो स्पर्श केला होता. हल्ली अशा घटना आणि अशा केसेस खूपच वाढल्या आहेत. कुठलेही एखादे वर्तमानपत्र उघडले तर अशा प्रकारच्या बाल अत्याचाराच्या अनेक बातम्या वाचण्यात येतात. पण दुर्दैवाने पालक या गोष्टीबद्दल एक तर अनभिज्ञ असतात किंवा लोकलज्जेस्तव या गोष्टी बाहेर कुठे बोलत नाहीत. पोलीस केस वगैरे तर दूरच आणि अशा वेळेस आवश्यक आहे ते ‘गुड टच आणि बॅड टच’ याबद्दल पुरेशी माहिती देणे. काही दशकापूर्वी या गोष्टीशी आपण अनभिज्ञ होतोत. पण काळ बदलला. मोबाईल आणि त्यावरच्या सोशल मीडियाने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातलाय. आणि त्यापासून आपल्या बाळाला वाचवणे आणि वाढविणे आवश्यक झाले आणि त्याकरता या गोष्टींची पालकांना आणि विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती असणं अत्यंत आवश्यक झालं आहे.
मुले कदाचित त्यांच्या भावना बोलून दाखवणार नाहीत. पण मुलांचे अचानक शांत होणे; अभ्यासातले लक्ष उडणे; भावनांचा अतिरेक होणे; उगीचच रडणे-चिडणे- रागावणे; काही विशिष्ट व्यक्तींना टाळणे; आई-वडिलांच्या मिठीतही अस्वस्थ होणे; आहार, अभ्यास, झोप या सवयीत कमालीचा बदल होणे ही आणि यासारखी काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब सतर्क व्हा आणि काहीतरी वेगळे घडले आहे का याचा अंदाज घ्या. नातेवाईकांचा, विश्वासार्ह मित्रमंडळींचा, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श ( चांगला आणि वाईट स्पर्श) शिकवताना मुलांना त्यांच्या अवयवांची पूर्ण माहिती करून द्या. जसे आपण लहान मुलाला डोळे, डोके, केस, जीभ, दात हे सगळे शिकवतो त्याप्रमाणेच शी आणि शू करायची जागा (प्रायव्हेट पार्टस, गुप्तांग) , छाती या सर्व जागा नीट समजावून सांगा. या ठिकाणी कुणीही स्पर्श केला तर त्वरित आई-वडिलांना सांगण्यास किंवा मुलांचा ज्यांच्यावर विश्वास आहे (उदा. काकी, आत्या, मावशी वगैरे) यांना सांगण्यास सांगा. या ठिकाणी केलेले स्पर्श असुरक्षित तर हात, डोके, पाठ यांना केलेले स्पर्श सुरक्षित हे त्यांना सांगा. त्याकरता प्रसंगी काही आकृत्या, चित्रे यांची जरूर मदत घ्या. ज्या स्पर्शाने तुम्ही बेचैन होता, तुम्हाला घृणा वाटते, कीळस वाटते, तिरस्कार वाटतो, लाज वाटते ते सगळे स्पर्श असुरक्षित आहेत हे त्यांना शिकवायला विसरू नका.
या गोष्टी आपले मूल तीन-चार वर्षाचे झाल्यापासूनच त्याला योग्य त्या भाषेत सांगणे आवश्यक आहे. हे सांगताना कदाचित आपल्याला थोडेसे अवघडल्यासारखे वाटेल, योग्य ती भाषा आणि योग्य ते शब्द सापडणार नाहीत. पण ही काळाची गरज समजून त्यांना त्यांच्या वयोमानाप्रमाणे आवर्जून सांगा. जर तुम्हाला सांगणे अवघड वाटत असेल तर जवळच्या एखाद्या नातेवाईकाची, शिक्षकांची, डॉक्टरांची मदत घ्या आणि या गोष्टी सविस्तर त्याच्याशी बोला. पाच वर्षाखालील मुलां मुलींना हे सगळे सविस्तर सांगणे, समजावणे अवघड आहे. त्यांना ‘तुमच्या शी किंवा शु च्या जागेला कुणी स्पर्श केला तर ताबडतोब सांगा, एवढेच शिकवावे.
मुलांशी सातत्याने संवाद आणि तो देखील सुसंवाद साधणे हे एक बालमानसशास्त्रातले महत्त्वाचे तत्व. त्याच्या वागणुकीतून, सवयीतून ते बालक आपल्याला काही ना काही संकेत देत असते. तुमचा जर मुलांशी संवादच नसेल तर हे संकेत तुम्हाला कळणार नाहीत. सतत ओरडणे, डाफरणे, शिक्षा करणे,उपेक्षा करणे हे टाळा. मार्क्स का कमी पडले? अभ्यास का केला नाही? डबा का खाल्ला नाही? यायला वेळ का झाला? हे व अशासारखे अनेक प्रश्न महत्त्वाचे असले तरी ते लगेच टाळा किंवा वेगळ्या स्वरूपात विचारा. मुलांशी जर तुमचा सुसंवाद असेल आणि त्याचा तुमच्यावर विश्वास असेल तर ते मुल तुम्हाला शाळेत किंवा बाहेर घडलेल्या सगळ्या गोष्टी लगेच सांगेल. तुमच्या दृष्टीने ते कितीही रटाळ, कंटाळवाणे असले तरी ते ऐका. घरी जर विसंवाद असेल तर विपरीत प्रसंगाबद्दल मुले घरी काहीही सांगणार नाहीत आणि मनातल्या मनात स्वतःला दोष देत कुढत बसतील आणि प्रश्न अधिकच गंभीर होत जाईल.
काही बाबतीत मुलांना लवकरात लवकर स्वावलंबी करणे पण आवश्यक आहे. उदा. स्वच्छतेचे काही नियम, आंघोळ करणे, कपडे बदलणे इत्यादी. त्यांचे कपडे परक्यांसमोर समोर मुळीच बदलू नका.
असा काही प्रसंग घडत असेलच तर या परिस्थितीतून त्वरित दूर जाणे, प्रसंगी अतिरेक करणाऱ्याला चावा घेणे, आरडाओरडा करणे, मदतीकरता हाका मारणे (मदत करा, वाचवा, हेल्प हे शब्द त्यांना शिकवा), त्यांच्याकडून घोकून घ्या आणि ते कसे उच्चारायचे हे सांगा.
काही दशकापूर्वी असे प्रसंग क्वचित घडत असत. पण आज ते सर्रास घडतायेत. उद्या आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे हे आपल्याला आज माहिती नाही. त्यामुळे वेळीच जागृत होऊन आपल्या मुलांना हे शिक्षण द्या. दुर्दैवाने असे काही घडलेच तर असे प्रसंग लोकलज्जेस्तव लपवून ठेवण्यापेक्षा शाळा प्रशासन, नातेवाईक, पोलीस, डॉक्टर यांना याची वेळीच माहिती द्या. कदाचित यामुळे पुढे घडणारे भयानक अतिप्रसंग टळतील.
शुभ्राने सर्व प्रसंग सांगितल्यानंतर शाळा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही केली आणि आज शुभ्रा तेवढीच आनंदी आणि उत्साही आहे. डॉक्टर होण्याची परत स्वप्ने बघते आहे!
8 thoughts on “बदलापूरचा बोध : ‘गुड टच, बॅड टच’”
Satya paristhiti.kahi goshti shaley abhyaskramat pn samavishta karayala havyat.mhanje hya goshti baddal vyakta honyachi sahajata mulan mdhe yeil
आभारी आहे.
लेख आवडला. पण मला असं वाटतं, केवळ गुड टच आणि बॅड टच हे समजून घेण्याने विकृत,नराधम यांच्या पासून मुले स्वतःला वाचवू शकत नाहीत. त्याच बरोबरीने शस्त्रसज्ज असणे आणि वेळ पडल्यास शस्त्र चालवणे या गोष्ठी सुध्दा प्रत्येक स्त्री,लहान मुले व मुली यांनी आत्मसात केल्या पाहिजेत. माझ्या मते आता कायदा हातात घ्यायची वेळ आली आहे.
थान्क्स, नितीन.
सर आपल्याला १०० तोफांची सलामी दिली तरी ती कमीच मानाचा मुजरा माझ्या कडून …
अशीच उत्तरोत्तर अनेक नेक कामे करत रहा न आम्हाला देखील काही मदत लागली त जरूर कळवा ( माँ . स . कृ . स. ) अर्थात महाराष्ट्र सकारत्मक सेवा सौस्था या सौस्थे तर्फे आम्ही देखील अनेक शाळेत जाऊन गुड टच आणि ब्याड टच विषयी जनजागृती करतो तसेच सेनेटरी पॅड वेंडीग मशीन देखील कित्येक मुलींच्या शाळेत बसवलेले आहे …. आज तुम्ही दिलेली माहिती देखील आम्हाला उपयुक्त आहे हा लेख असा च्या असा तुमच्या नावा निशी मी आमच्या ग्रुप वरती सेंड करतोय लिंक सकट 🚩👌👏🙌🙏🙏🙏🙏
आभारी आहे !
आभारी आहे.
काळाची गरज असलेला व पालक आणि मुले यांमधील सूसंवाद कसा साधावा याकरीता पालकांसाठी सुंदर लेख