तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला,
खेळ मांडला..
दुपारची भयानक शांतता. एरवी पादचारी, रिक्षा, चारी चाकी, दुचाकी वाहने, त्यांचे कर्कश हॉर्न, विक्रेते, शाळेत जाणारी मुले, त्यांचा आरडाओरडा याने गजबजलेला रस्ता आणि त्या रस्त्यावरची वाहतूक एकदम सुनसान. क्वचित झाडाची सळसळ आणि वर्षानुवर्षे न ऐकलेला चिमण्यांचा किलबिलाट सोडला तर एकदम स्मशान शांतता. आणि अचानक गाणं लागलं “खेळ मांडला”. डोळ्यात पाणी उभं राहिलं. कारण? कोरोना करिता पुकारलेला जनता कर्फ्यु, त्यातली भयानक शांतता आणि पार्श्वभूमीला हे गाणं.
आज जगात अनेक देशात अनेक विनाशकारी अण्वस्त्र आहेत, ही पृथ्वी सात वेळेस नष्ट करणारे अणुबॉम्ब आहेत. पण एका टाचणीच्या टोकावर अब्जावधीच्या संख्येने मावणाऱ्या एका अत्यंत सूक्ष्म विषाणूने संपूर्ण मानवजातीला देश,धर्म, जात, काळा, गोरा, हे सगळं विसरायला लावून अक्षरशः गुडघे टेकायला लावलेत. आज हे भयावह चित्र आहे आणि उद्या काय होईल, भविष्यात काय घडेल याचा काहीही थांगपत्ता नसतांना या सूक्ष्म जीवाने एक भीतीची लाट सगळ्या विश्वात पसरलेली आहे.
हे सगळे कसे घडले असेल?
हे कसे घडले याचं उत्तर सरळ आहे. सगळीकडे याची चर्चा व सविस्तर माहितीही आहे. प्राण्यात, निश्चित सांगायचे झाले तर फक्त आणि फक्त वटवाघळात आनंदाने रहाणारा विषाणू चीनच्या ‘वूहान’ प्रांतात मानव प्राण्यात शिरला, वाढला, पसरला. पसरत पसरत तो एवढा पसरला की प्रांत, राज्य, देश याच्या सगळ्या सीमा ओलांडून तो अडीचशे पेक्षा जास्त देशात आणि तिथल्या नागरिकांत पसरला आणि त्याने नरसंहार सुरू केला. त्याला आवरायचे कसे आणि रोखायचे कसे याचे उत्तर भल्याभल्यांना सध्यातरी देता येत नाही. परग्रहावर पाऊल ठेवणारे, निसर्गाला वेठीस धरून आश्चर्यजनक शोध लावणारे, निसर्गावर मात करून पराक्रम गाजवणारे आम्ही हुशार मानव आज या सूक्ष्मजीवास आवरायचे कसे नी पिटाळायचे कसे याचे उत्तर शोधतांना केवळ हतबलच झालो नाहीत तर रडकुंडीला आलो आहोत. एव्हाना हे कसे घडले, या विषाणूचा प्रसार कसा झाला हे आम्ही शोधले पण हे का घडले याचं उत्तर मात्र अधांतरीच आहे.
हे का घडले असेल?
हे कसं घडलं हे सांगणे एक वेळ सोपे आहे पण हे का घडलं हे सांगणे खरोखरच अवघड आहे. निसर्ग आपल्याला कांही सिग्नल तर देत नाही ना? “निसर्गो रक्षती रक्षक :” याची आठवण तर करून देत नाही ना?
निसर्गापुढे आपण किती क्षुद्र आहोत हे निसर्गाने परत एकदा ठळकपणे आपणाला जाणवून दिले. दुबळा मानव व बलाढ्य निसर्ग (त्याला आपण नियती म्हणतो) यांचा संघर्ष वर्षानुवर्षे चालू आहे. ४८० कोटी वर्षापूर्वी ही पृथ्वी जन्मली. कोट्यावधी वर्षानंतर या पृथ्वीवर अनेक सूक्ष्म जीव अवतरले आणि त्यानंतर अनेक कोटी वर्षानंतर मानवाची निर्मिती. याचा अर्थ हे विषाणू मानवाच्या कोट्यावधी वर्ष आधी या पृथ्वीतलावर नांदत होते. आज लोकसंख्या अपार झाली आहे, प्रचंड झाली आहे असे म्हणतो. प्रचंड म्हणजे किती? ७५० कोटी! आज विषाणू किती असतील? अनुकूल स्तिथी व पोषण उपलब्ध असल्यास एका दिवसात हे विषाणू २८०००० अब्ज जीव वाढवतो. हिशोब लागतो कांही? तुलना होते काही?
बरे हे विषाणू आणि मानव इतके दिवस एकमेकांबरोबर सुखाने सुखनैव नांदत होते. बरेचसे विषाणू फक्त प्राण्यांपर्यंतच मर्यादित होते. त्यांच्या शरीरातही परजीवी असले तरी त्यांना इजा न करता एकत्र नांदत होते. मानावाचेही तसेच. आपल्या शरीरात अनेक सूक्ष्म जीव कांहीही आजार उत्पन्न न करता, क्वचित आपल्या आरोग्याला मदत करीत नांदत होते व आहेत. काहींनी मानवात बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने मानव कांही आहुती देऊन त्यांच्यावर मात करण्यात यशस्वी ठरला.
पण………!
पण कांही वेळेस मानवावर मात करण्याचा आणि मानव जातच धोक्यात आणण्याचा हे सूक्ष्म जीव प्रयत्न करतात. आणि आम्ही मानव प्राणी, त्यातील डॉक्टर्स, संशोधक, वैज्ञानिक हुशार का हे सूक्ष्म जीवजंतू हुशार असा प्रश्न निर्माण होतो.
मला नेहमी अशी शंका येते की जशी आपली (मानव प्राण्यांची) मेडिकल कॉलेजेस, त्यात काम करणारे डॉक्टर्स, त्यांचे संशोधन, वेगवेगळ्या आजारात औषधे शोधून काढणारे संशोधक असतात तसे या जीवजंतूमध्ये तर नाहीत ना? त्यांची ही मेडिकल कॉलेजेस, डॉक्टर, संशोधक असतात का? साधे उदाहरण टी.बी.च्या आजाराचे घेऊत. क्षयरोग (टी बी) या त्या काळी जीवघेण्या आजाराचे आम्ही जंतू शोधून काढले, या टी बी च्या जंतूंना मारण्याकरिता आपण अनेक औषधे शोधून काढली, लसही शोधली आणि बहुसंख्य रुग्ण बरेही झाले.आम्ही निश्वास सोडला. पण काही दिवसानंतर या औषधांचा या टी बी च्या जंतूंवर काहीच परिणाम होत नाही असे दिसून आले. त्याचे कारण टी बी च्या जंतूंनी त्यांचा जीन पॅटर्न बदलला होता, ज्याला शास्त्रीय भाषेत म्युटेशन (mutation) असे म्हणतात. या जंतूंनी त्यांचे जीन्स बदलून नवा अवतार घेतला आणि हे जंतू आमच्या औषधांना जुमानेसे झाले. त्याला आम्ही रेझिस्टंट ट्युबरक्यूलोसिस हे नाव दिले. आमचे संशोधन परत चालू (आणि कदाचित जंतूंचेही). मलेरियाचे आणि अनेक आजाराचे तसेच झाले आणि या आजाराच्या उच्चटनाचे काम अवघड झाले.
कोरोनाच्या बाबतीतही असेच झाले. हे विषाणू वटवाघळात सुखाने राहत होते. मानवाच्या शरीरात त्याचा शिरकाव झाला नव्हता. पण त्यांच्या जीनमध्ये त्यांनी बदल केले (म्युटेशन) आणि प्राण्यातून मानवाच्या शरीरात शिरण्याचे कौशल्य त्यांनी (संशोधन करून !) हस्तगत केले. वटवाघाळाच्या शरीरातून मानवाच्या शरीरात शिरले खरे पण एका मानवाच्या शरीरातून दुसऱ्या मानवाच्या शरीरात शिरण्याचे काय? परत त्यांचे संशोधन, परत जीनमध्ये बदल करणे, परत म्युटेशन आणि त्यांनी मानवातून मानवात शिरण्याचे कौशल्य हस्तगत केले. हुशार जीवजंतूच निघाले. मानवाच्या शरीराला हे जंतू नवीनच. ना त्यांना प्रतिकारशक्ती निर्माण करायला वेळ मिळाला ना औषधे शोधायला ना त्याच्यावर लस विकसित करायला. आणि केवळ प्राण्यात असलेले जंतू आज मानवी जीवनात हाहा:कार माजवित आहेत.
औषधे आणि प्रतिबंधक लस
समोरचा शत्रू (विषाणू) अत्यंत हुशार आहे. जीन बदलून (म्युटेशन !) त्याने (आणि पर्यायाने निसर्गाने) आपल्यावर आपण गाफील असताना अत्यंत त्वेषाने वार केला आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी कंबर कसून अहोरात्र मेहेनत करून यावर संशोधन सुरू केले आहे. शेवटी हे वैद्यकीय शास्त्र आहे, गणित नाही. यातही वेगवेगळे प्रयोग व असंख्य चाचण्या असतात. त्याला वेळ द्यावा लागणारच. तो पर्यंत शास्त्रज्ञांनी शासनामार्फत आपल्या भल्याकरिता सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे एवढेच आपल्या हातात आहे.
आजाराचा प्रसार रोखणे हेच आता आद्य कर्तव्य
एका बाजूला संसर्ग होऊन आजारी झालेल्या रुग्णांवर उपलब्ध असलेल्या साधनसमुग्रीसहित उपचार करणे याकरिता निष्णात डॉक्टर्स तर दुसऱ्या बाजूला या आजाराचा प्रसारआपल्या गावात, जिल्ह्यात, राज्यात व देशात वेळीच रोखण्याकरिता आज सर्व प्रशासन सर्व शक्तीनिशी (जीवानिशी) प्रयत्न करीत आहे. एका संसर्ग झालेल्या माणसाचा दुसऱ्या सुदृढ व्यक्तीशी संपर्क होऊ न देणे हा आजचा मुख्य हेतू. कारण ही एकच व्यक्ती हजारोना आणि हे हजारो अज्ञात रुग्ण लाखोंना बाधित करू शकतात हे एकच सत्यय. त्याकरिता अलगीकरण, विलगिकरण या मार्गांचा अवलंब करीत सर्व लोकांना कुठेही स्थलांतर करण्यास प्रतिबंध करणे (कर्फ्यु) हा महत्वाचा मार्ग शासन व प्रशासन अवलंबित आहे. सर्वांनी कुठलीही शंका-कुशंका न घेता, जात -पात, धर्म, पक्ष, डावी-उजवी विचारसरणी सर्व विसरून शासनाने व प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे गांभीर्याने काटेकोर पालन करणे एवढीच एकच गोष्ट आपल्याला करावयाची आहे. इटलीने नेमके हेच केले नाही, परिस्थितीचे गांभीर्य ओळखले नाही आणि आज तो देश एका अत्यंत वाईट परिस्थितीतुन जात आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण जर तीच चूक केली तर फार हाहा:कार उडेल. जागोजागी प्रेताचा खच दिसेल व हॉस्पिटल तर सोडा पण स्मशानभूमीपण मिळणार नाही. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचा एवढा तुटवडा असेल की कुणाला जगवायचे व कुणाला सोडून द्यायचे हे शासनालाच ठरवावे लागेल. इटलीमध्ये आज हेच होते आहे. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा. आज पोलीस बाहेर पडल्यावर दांडके मारीत आहेत. कदाचित उद्या त्यांना वेगळा गंभीर निर्णय घ्यावा लागेल, तेंव्हा फार वेळ झाला असेल.
(पुढील लेख: निसर्ग तर आपला सूड घेत नसेल?)